बीड : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा माझ्या वडिलांचा आत्मा होता. आता काही लोक म्हणतात की, गोपीनाथ मुंडेंचा कारखाना त्यांच्या मुलीने विकला. मात्र, बापाचा आत्मा कधी कोणी विकू शकतं का? असा सवाल मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. कारखाना गंजून कोसळण्यापेक्षा किंवा त्याचे कुलूप गंजून पडण्यापेक्षा तो सुरू राहणे आणि या भागातील शेतकऱ्यांचा ऊस तिथे जाणे हे माझ्यासाठी महत्वाचे होते, असे त्या म्हणाल्या. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या लिलावावर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय कामगार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी होता असे सांगत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला.
परळीतील दिवाळी स्नेह मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या की, एखाद्या बँकेचे कर्ज आपण घेतले आणि ते फेडू शकले नाही. तर तुम्ही काय करता वसुलीसाठी? तेच वैद्यनाथच्या बाबतीत घडलं. पण काही लोक मी कारखाना विकला, असा अपप्रचार करतात. त्यांच्याशी डोकं लावण्याची गरज नाही. राज्यातील आजारी कारखाने जगवण्यासाठी सगळ्यांना मदत मिळाली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईसह काही कारखान्यांना पैसे मिळाले. पण माझ्या कारखान्याला मिळाले नाही. तुम्ही शांत राहून आपले काम करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कारखाना सुरू आहे. या कारखान्यात ऊस कोणाचा तुमचाच जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.









