बीड : सामाजिक न्याय विभाग आणि बीड जिल्हा परिषदेच्या वतीने ऊसतोड कामगार महिलांसाठी ‘मिशन साथी’ उपक्रम, ‘मिशन साथी’ पुस्तिकेचे विमोचन आणि ऊसतोड कामगार मेळावा छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात पार पडला. यावेळी ऊस तोड मजुरांसाठीच्या मिशन साथी उपक्रमाची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, सतीश चव्हाण, विक्रम काळे, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित आणि वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन विभागाकडे हस्तांतर करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी काम केले. त्यांच्या प्रेरणेतून महामंडळ स्थापन झाले आहे. आता ऊसतोड मजुरांचा अपघातात मृत्यू झाल्यास दिल्या जाणाऱ्या पाच लाखांच्या सानुग्रह अनुदानात दुप्पट वाढ करण्याचा विचार आहे. ‘मिशन साथी’ योजनेतून प्रत्येक ऊसतोड गटातील एक महिलेला प्रशिक्षण देण्यात येणार असून, तिला आरोग्य किट दिली जाणार आहे. अशा एक हजार महिलांना किटचे वाटप कार्यक्रमात करण्यात आले. या मेळाव्यानंतर ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १५०० महिलांची तपासणी झाली.