बीड : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ नियोजन खात्याशी जोडावे, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. गुरुवारी ऊसतोड कामगारांसाठी आयोजित मेळावा व आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर हे आमदारही यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ऊसतोड कामगारांचा काम करताना मृत्यू झाल्यास पाच लाखांची मदत देणारी सानुग्रह अनुदानाची रक्कम १० लाख करावी, तर अपंगत्व आल्यास देण्यात येणाऱ्या अडीच लाखांची रक्कमही दुप्पट म्हणजे पाच लाख करावी, असे मुंडे यांनी सूचवले असून, त्यादृष्टीनेही सकारात्मक विचार करण्यात येईल. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी २२ वसतिगृहांपैकी १६ सुरू झालेली आहेत. या मुलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनेही इनोव्हेशन व इन्क्यूबेशन सेंटर २०० कोटी रुपये उभारून सुरू केले जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. परळी-बीड-अहिल्यानगर या रेल्वेमार्गाचे कामकाज प्रगतीपथावर आहे. त्यातील बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्ग पूर्ण झालेला असून, त्यावरून चाचणीही झालेली आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या दिवशी बीडहून अहिल्यानगरपर्यंत रेल्वे सुरू करण्याचा विचार सुरू आहे असे ते म्हणाले.