बीड : आनंदगाव (ता. केज) येथील येडेश्वरी साखर कारखान्याचा कारखान्याचा बारावा गळीत हंगाम सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. या युनिट क्रमांक एकमध्ये सध्या दररोज सरासरी सुमारे नऊ हजार टन ऊस गाळप होत आहे. त्यामुळे गेल्या ५४ दिवसांत ४ लाख टन ऊस गाळप केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगीतले. ऊस गाळपाबरोबरच कारखान्यांतर्गत कार्यरत असलेला २६ मेगावॉट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्पही प्रभावीपणे सुरू आहे. इथेनॉल निर्मितीही जोरात सुरू आहे, असे ते म्हणाले.
चेअरमन तथा खासदार सोनवणे यांनी सांगितले की, कारखान्यात काटेकोर नियोजन, यंत्रसामग्रीची तत्पर देखभाल आणि कामगारांचे नियोजन, यामुळे गाळपाचा वेग कायम ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेवर आणि विना अडथळा गाळप होत असल्याने शेतकरीही समाधानी आहेत. वीज प्रकल्पातून आतापर्यंत १,९३,६४,२०० युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. त्यापैकी ७२,५४,९०० युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात करण्यात आल्याची आहे. वीज निर्मितीमुळे कारखान्याला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला. याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल.

















