बीड : माजलगाव मतदारसंघ कार्यक्षेत्रात असलेल्या तीन साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत सहा लाख ३५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. माजलगाव धरण यंदा भरल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्यामुळे यंदादेखील उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात तीन मोठ्या साखर कारखान्यांसह गूळ, गूळ पावडर निर्मितीसाठी छोटे गुऱ्हाळही सध्या सुरू आहेत. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागला असून शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळण्यास मदत मिळत आहे.
असे असले तरी यंदाच्या हंगामात कारखानदारांनी उसाचा भाव जाहीर न करताच ऊस गाळपास सुरवात केली होती. त्यामुळे उसाचा दर जाहीर करा, अन्यथा गाळप बंद करा, अशी भूमिका युवा शेतकरी संघर्ष समितीने घेतली होती. त्यामुळे आठ दिवस साखर कारखाने बंद पडले होते. यानंतर कारखानदार व शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत ऊस दरवाढीवर तोडगा निघाल्याने पुन्हा कारखाने सुरू झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत तीन साखर कारखान्यांनी सहा लाख ३५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

















