बीड: माजलगाव तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध आहे. मात्र स्थानिक कारखान्यांची यंत्रणा विस्कळित असल्याने आणि तोडणीसाठी लागणारा वेळ पाहता शेतकऱ्यांनी आता परजिल्ह्यातील कारखान्यांना पसंती दिली आहे. सध्या लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि जय महेश साखर कारखाना या तीनही कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख २३ हजार ११७ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. गूळ पावडर निर्मिती कारखाने आणि अनेक गुऱ्हाळेही जोमाने सुरू आहेत. तरीही तालुक्यात अद्याप लाखो टन ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील तब्बल ८० हार्वेस्टर्स आणि ऊसतोड टोळ्यांनी माजलगावच्या बांधावर शिरकाव केला आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या माजलगाव तालुक्यात ट्वेंटी वन कारखान्याचे २६, जय भवानी कारखान्याचे १४, योगेश्वरी कारखान्याचे ११, गंगाखेड कारखान्याचे ९ यांसह पंचगंगा, अंबालिका, दौंड अशा जवळपास विविध सुमारे १२ साखर कारखान्यांचे हार्वेस्टर्स रात्रंदिवस ऊस तोडणी करत आहेत. तर तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याने आतापर्यंत सर्वाधिक ८,०८, ३१८ टन उसाचे गाळप केले असून, शेतकऱ्यांना २,७७५ रुपये प्रति टन इतका दर दिला जात आहे. तर लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याद्वारे ५,०३,९०० टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. कारखान्याने प्रतिटन २, ७७५ रुपये दर दिला आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत ३,१५,००० टन उसाचे गाळप केले असून, या कारखान्याचा दर २,७५० रुपये प्रति टन इतका आहे. गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे झुकत असतानाही शेतात उभा असलेला ऊस पाहून शेतकरी धास्तावले होते. अशा संकटकाळात या हार्वेस्टर तोडणीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक तिन्ही कारखान्याच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचा सर्व ऊस गाळप केला जाईल, असे सांगितले आहे.

















