बीड : सर्जापूर येथील सुंदराबाई नरहरी कोरके कनिष्ठ महाविद्यालयाच्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या गणेश बालाजी चौरे या ऊस तोडणी कामगाराच्या मुलाने बारावी परीक्षेत कला विभागातून ९२ टक्के गुण घेऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत हे यश मिळवले. गणेश हा इयत्ता तिसरीपासून बारावीपर्यंत सर्जापूरच्या आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. आई वडिलांच्या परिस्थितीची जाण ठेवून गणेशने बारावीच्या परीक्षेत सतत अभ्यास करून उत्तम यश मिळवले आहे. गणेशची एक बहीण नर्सिंगचा कोर्स करत असून दुसरी बहीण इयत्ता आठवी शिकते.
गणेशचे वडील बालाजी चौरे (रा. धारूर, जि. बीड) व आई गेल्या १८ वर्षांपासून ऊस तोडणी मजुरीचे काम करतात. दरवर्षी ते कर्नाटक राज्यातील विविध साखर कारखान्यावर जिथे मिळेल तिथे ऊसतोड मजुरीचे काम करतात. चौरे कुटुंबीयांची शेती नाही. गणेशच्या आई-वडिलांनी ऊस तोडणीचे काम करताना मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सर्जापूर आश्रमशाळेत दाखल केले होते. गणेशला दहावी परीक्षेत ८७ टक्के गुण मिळाले होते. चांगले गुण मिळूनही गणेशने विज्ञान शाखा न निवडता कला शाखा निवडली. आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून त्यांनी ऊसतोड मजुरीचे काम भविष्यकाळात करू नये म्हणून मी सतत अभ्यास करत होतो. यापुढेही अभ्यास करत राहणार आहे. या पुढच्या काळात स्पर्धा परीक्षा देऊन राज्यसेवा परीक्षेत यश मिळविण्याचे ध्येय राहणार आहे असे गणेशने सांगितले.