बीड : ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडमधून प्रत्येक वर्षी १ लाख ७५ हजार मजूर ऊस तोडीला जातात. यापैकी ७८ हजार महिला, तर ९६ हजार पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ८४३ महिलांची ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचे समोर आले होते. यात ३० ते ३५ वयोगटातील ४७७ महिलांचा समावेश होता. याविषयी दिल्लीत संसदेतही चर्चा झाली आहे. महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी बुधवारी राज्यसभेत यावर लेखी माहिती देत खुलासा केला आहे. सहकार, कामगार, आरोग्य विभागासह संबंधीत विभाग सतर्क असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत महिला व बालविकास राज्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यात २०२२-२५ दरम्यान २११ महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या शस्रक्रिया वैद्यकीय गरजेपोटी असून जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीनेच केल्या जातात. ऊस तोडणी कामगारांमधील अडचणींवर उपाय म्हणून, राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी आरोग्य तपासणी आणि प्रजनन आरोग्य जनजागृती मोहीम राबवली आहे. यात अनावश्यक शस्त्रक्रियांचे धोके आणि कुटुंब नियोजन पद्धतींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, २०२५ पूर्वीच्या अनेक वर्षांत जिल्ह्यातील ८४३ महिलांची गर्भपिशवी काढल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला होता. तसेच १५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड झाले होते. याबाबत प्रसार माध्यमांनी वृत्त देताच शासन आणि आरोग्य विभागाने जनजागृती केली आहे. काही उपाययोजना केल्या आहेत.