बीड : ऊस पिकावर पांढरी माशी, पायरीला या किडींचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वरील गावांमध्ये ऊस पिकाची पाने पिवळी पडून वाळत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादनामध्ये घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ट्वेंटी वन शुगर्स युनिट – २ च्या वतीने मुख्य शेती अधिकारी तुकाराम गडदे, ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर व ऊसपुरवठा अधिकारी रतन कदम यांनी शेतीशाळा घेऊन मार्गदर्शन केले. ऊस पिकामधील कीड व रोग यांचे व्यवस्थापन करून नुकसान टाळण्यासाठी शेतीशाळा घेण्यात आली.
शेतकरी राजेंद्र बाचपल्ले यांच्या क्षेत्रावर फेरी आयोजित करून पट्टा पद्धतीने लागवड तसेच पाचट आच्छादन केल्यामुळे झालेल्या फायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. सततचे ढगाळ वातावरण, पावसाने दिलेली ओढ आणि अचानक तापमानात होत असलेली वाढ यामुळे ऊस पिकावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत ऊस विकास अधिकारी येळकर यांनी पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाची निरीक्षणे दाखवून व्यवस्थापनासाठी ड्रोनच्या सहाय्याने ऊस पीक फवारणीसाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के १२० मिली किंवा थियामेथोक्सम २५ टक्के डब्ल्यूजी कीटकनाशक ५० ग्रॅम प्रति एक एकर क्षेत्रासाठी फवारणी करावी, असा सल्ला दिला.