बेळगाव: येथील हिरण्यकेशी साखर कारखान्यात कामगार दिनानिमित्त एक आगळा-वेगळा उपक्रम पार पडला. कामगार दिनानिमित्ताने कारखान्याच्या कामगारांची पाद्यपूजा करण्याचा कार्यक्रम झाला. कारखान्याचे मार्गदर्शक माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांनी कामगारांची पाद्यपूजा करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जोल्ले दांपत्याने कामगारांची पाद्यपूजा केली. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा आगळावेगळा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
माजी खासदार व आमदारांनी पाद्यपूजा करून सन्मान केल्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. या सन्मानामुळे आपण भारावून गेल्याच्या भावना अनेक कामगारांनी व्यक्त केल्या. कामगार भारावून गेले होते. यापुढील काळात कारखान्याच्या प्रगतीसाठी जोमोन काम करू, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, साखर कारखान्याने कामगारांच्या मदतीनेच आजपर्यंत मोठी मजल मारली आहे. त्याची पोचपावती म्हणून आज कामगारांचा आम्ही पाद्यपूजा करून सन्मान केला आहे. कामगारांमुळेच आज उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. त्यांचा गौरव करणे क्रमप्राप्त आहे. असेच सहकार्य कामगारांनी आम्हाला यापुढे करावे, अशी अपेक्षा आहे.