बेळगाव : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने इथेनॉल वाहतुकीसाठी ५ टँकरची खरेदी केली आहे. प्रत्येकी ४० हजार लिटर क्षमतेचे हे टँकर आहेत. कारखान्यात प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती होते. या इथेनॉलची विक्री करण्यासाठी कारखान्याने स्वमालकीच्या टँकरची खरेदी केली आहे. ज्यामुळे कारखान्याला फायदा होणार आहे. या टँकरवर चालक व क्लीनरला रोजगार मिळेल. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून या टँकरची खरेदी केली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली.
कारखान्याने घेतलेल्या टँकरचे पूजन करून शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यकारी संचालक अप्पासाहेब शिरगावे यांनी स्वागत केले. कार्यालयीन अधीक्षक गजानन रामनकट्टी यांनी आभार मानले. आमदार शशिकला जोल्ले, कारखान्याचे चेअरमन एम. पी. पाटील, व्हा. चेअरमन पवन पाटील, संचालक आप्पासाहेब जोल्ले, जयवंत भाटले, रमेश पाटील, रामगोंडा पाटील, रावसाहेब फराळे, समित सासणे, प्रकाश शिंदे, शरद जंगटे, सुकुमार पाटील आदी उपस्थित होते.