बेळगाव : हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण पूर्णत्वास आले आहे. सध्या एक मील सुरू असून रविवार (ता. १६) पासून दररोज ११ हजार टनाप्रमाणे क्षमतेने गाळप सुरू होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली. अध्यक्ष पाटील म्हणाले, कारखान्याचे मार्गदर्शक, माजी खासदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वात कारकान्याचे विस्तारीकरण वाढले आहे.
याआधी कारखान्याची गाळप क्षमता ६ हजार मेट्रिक टन होती. त्यानंतर पुन्हा अडीच हजार वाढ करून ती ८ हजार ५०० वर पोहोचली. आता कारखान्यात दररोज ११ हजार मेट्रिक टन ऊस गाळपाची व्यवस्था आहे. संचालक प्रकाश शिंदे म्हणाले, हंगाम काही दिवस लांबला तरी १० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कुठलीही अडचण नाही. कारण ऊसतोडण्या सुरू असून ऊस तळावर मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. जवळपास ६० हजार एकर क्षेत्रातील उसाची नोंद कारखान्याकडे आहे. संचालक जयवंत भाटले यांनीही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक रामगोंडा पाटील, अविनाश पाटील, सुनील पाटील, सुहास गुग्गे उपस्थित होते.
















