बेळगाव : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गाळप हंगामात किमान दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कामगार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले. येथील हिरण्यकेशी साखर कारखान्यात झालेल्या बॉयलर प्रदीपन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत ते होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बसवराज कल्लटी होते. डॉ. शिवलिंगेश्वर स्वामी, विद्या नृसिंह भारती स्वामींनी लक्ष्मीपूजन करून बॉयलर प्रदीपन केले.
जोल्ले म्हणाले, “दिवंगत अप्पणगौडा पाटील यांनी या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावेत. शैक्षणिक स्तर उंचावावा, या उद्देशाने या कारखान्याची स्थापना केली. एकेकाळी ‘एक तोळे सोन्याचा दर, एक टन उसाला’ देणारा हा कारखाना पुन्हा वैभव प्राप्त करेल. सध्या कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी उसाला जादा दर देण्यासाठी साखरेसह इथेनॉल, वीज, खत, राखेपासून वीट निर्मितीसारख्या उपउत्पादनांना चालना देणे आवश्यक आहे. या माध्यमातून कारखान्याला जादा नफा मिळेल कर्जफेड शक्य होईल.”
जोल्ले म्हणाले, मी स्वतः बिरेश्वर सोसायटी, जिल्हा बँकेकडून कर्ज काढून या कामासाठी निधी उभा करत आहे. या कारखान्याच्या नफ्या-तोट्याची जबाबदारी मी स्वतः घेईन. पुढील आठ ते दहा वर्षांत कारखाना कर्जमुक्त करून गतवैभव प्राप्त करणे हे माझे ध्येय आहे,” शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला तोडणी-ओढणीसाठी स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. चिक्कोडी व निपाणी भागातील कारखान्यांनी जसा दर दिला तसाच दर येथेही दिला जाईल. वजन चोख ठेवून प्रत्येक पंधरा दिवसांनी ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जातील. कामगारांना बोनसही दिवाळीपूर्वी दिला जाईल.
डॉ. शिवलिंगेश्वर स्वामी म्हणाले, “अण्णासाहेब जोल्ले यांचा सहकारातील अनुभव मोठा आहे. त्यांची कार्यपद्धती शेतकरी व कामगार हिताची आहे. समाधानकारक वेतन, योग्य ऊसदर आणि पारदर्शकता या माध्यमातून कारखाना सुरळीत चालविणे महत्त्वाचे आहे. कामगारांनी प्रामाणिकपणे काम करावे. शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करून सहकार्य करावे.” आमदार शशिकला जोल्ले, शशिकांत नाईक, राजेंद्र पाटील, शशीराजे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी यांनी स्वागत केले. सी. आर. हंचीनमनी यांनी सूत्रसंचालन केले. महालिंग हंजी यांनी आभार मानले.
या वेळी अध्यक्ष बसवराज कल्लटी, संचालक अप्पासाहेब शिरकोळी, मल्लिकार्जुन पाटील, प्रभुदेव पाटील, बसवराज मरडी, बाबासाहेब आरबोळे, सुरेंद्र दोडलिंगन्नावर, शारदा पाटील, भारती हंजी, ज्योतीप्रसाद जोल्ले, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरे, शंकर हेगडे, सुरेश हुंचाळी, विष्णू रेडेकर, दुंडप्पा वाळकी, बसवराज बागलकोटी, व्यवस्थापकीय संचालक ईरनगौडा देसाई, रविंद्र चौगला आदींसह परिसरातील शेतकरी, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.









