बेळगाव : यंदा जिल्ह्यासह राज्यात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस होत असल्याने विविध पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस, कापूस, मका, सूर्यफूलसह एकदल, द्विदल धान्याची पेरणी केली आहे. जिल्ह्यातील काही भागातील ऊस आणि अन्य पिकांवर करपा व अन्य किडीची लागण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामानाचा फटका आणि रासायनिक खतांचा अतिवापर किडीचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरत असल्याचे कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासाठी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांचा वारंवार वापर करावा लागत असून यामुळे त्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. तर अधिक प्रमाणात कीटनाशकांचा वापर केल्याने पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही भागात पावसाच्या अभावामुळेही किडीचा प्रादुर्भाव होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोटॅशियम आवश्यक असून याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खात्यातर्फे सर्व जिल्ह्यात आवश्यक आणि समतोलपणाने खतांचा वापर करावा, असे सांगण्यात येत आहे. कृषी विभागाचे सहसंचालक एच. डी. कोळेकर म्हणाले कि, किडीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी खात्यातर्फे कृषी तज्ज्ञांकडून कीटनाशक वापरासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक प्रमाणानुसारच कीटकनाशकांचा वापर करावा.
चिक्कोडी विभागातही रोगाचा प्रादुर्भाव..
किरकोळ पाऊस आणि नद्या पात्राबाहेर अशी स्थिती झाली. एकही मोठा पाऊस झाला नसल्याने शेतामध्ये असलेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. उसावर लोकरी मावा वाढला आहे. वेदगंगा, दूधगंगा, कृष्णा नदीकाठी सर्वच ठिकाणी हे चित्र दिसून येत आहे. मोठा पाऊस झाल्यावर रोग नष्ट होतो, असे कृषी अधिकारी सांगत आहेत. पण, अद्याप पुरेसा चांगला पाऊस नसल्याने पिकांची वाढही खुंटली आहे.