बेळगाव : शेतकरी व कामगारांच्या हितासाठीच पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मी आणि माजी खासदार रमेश कत्ती दोघेही एकत्र आलो आहोत. यापुढे कत्तींच्या नेतृत्वाखालीच कारखाना चालविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती काँग्रेसचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तब्बल ३० वर्षानंतर श्री हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील घडामोडींच्या निमित्ताने मंत्री पाटील व कत्ती एकत्र आले आहेत. माजी खासदार रमेश कत्ती व आण्णासाहेब ज्वोले यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार निखिल कत्ती, कारखान्याचे अध्यक्ष शंकर कलट्टी, सर्व संचालक उपस्थित होते.
हुक्केरी तालुक्याच्या राजकीय पटलावर मी एकटाच ॲक्टर नसून आम्ही सर्वजण ॲक्टर व प्रोड्युसर आहोत, असा टोला खासदार कत्ती यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा नामोल्लेख टाळून लगावला. वीज संघाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी खासदार ज्वोले यांनी आर्थिक अरिष्टातील कारखाना चालवण्यासाठी पुढाकार घेतला होता. आर्थिक गुंतवणुकीसह कारखान्यातील अंतर्गत सुधारणेलाही त्यांनी सुरुवात केली होती. दरम्यान, नाट्यमय घडामोडीनंतर कत्ती व पाटील हे दोघेही एकत्र आल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.