बेळगाव : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गत एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी खासदार व कारखान्याचे मार्गदर्शक अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले. हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात आयोजित कामगार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष बसवराज कल्लटी होते. व्यासपीठावर आमदार शशिकला जोल्ले, कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते.
जोल्ले म्हणाले, कारखान्याच्या कामगारांना महिन्याला सरासरी तीन ते चार हजार पगारवाढ मिळणार आहे. यामुळे प्रतिवर्षी १.२५ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. ज्येष्ठ संचालक शिवनायक नाईक, बाबासाहेब आरबोळे व आमदार शशिकला जोल्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कामगार संघटनेचे अध्यक्ष मोहन कोठीवाले यांनी स्वागत केले. ए. एल. हंचीनमनी यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष नाशिपुडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संचालक प्रभुदेव पाटील, बसवराज मरडी, सुरेंद्र दोडलिंगन्नावर, कार्यकारी संचालक सातप्पा कर्कीनाईक, पवन पाटील आदी उपस्थित होते.