बेळगाव (कर्नाटक) : जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता जोमाने सुरू झाला आहे. निपाणी व चिकोडी तालुक्यातील साखर कारखान्यांना नजीकच्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे आव्हान आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून निपाणी व चिकोडी तालुक्यातील उसाची मोठ्या प्रमाणात तोड केली जात आहे. या साखर कारखान्यांनी ३४०० पेक्षा अधिक दर जाहीर केला आहे. त्या तुलनेत निपाणी व चिकोडी तालुक्यातील साखर कारखान्यांनी ३३५० ते ३३६० रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गाळप उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी निपाणी व चिकोडी तालुक्यातील साखर कारखान्यांना मोठा प्रयत्न करावा लागणार आहे.
हालसिद्धनाथ शुगर व जैनापुर येथील अरिहंत साखर कारखान्याला मशिनरी चालू होण्यास थोडा विलंब लागला. महाराष्ट्रातील छत्रपती शाहू साखर कारखाना, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना व संताजी घोरपडे साखर कारखान्यांनी गेल्या महिन्याभरात बहुतांश उसाची उचल केली आहे. तसेच, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना हुपरी, दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ, पंचगंगा साखर कारखाना गंगानगर आदी साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र हे कर्नाटक हद्दीला लागून आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबरला सुरु होतो व त्याचवेळी कर्नाटकमधील हंगाम मात्र १ ते १० ऑक्टोबरला सुरु होतो. त्यामुळे कर्नाटकमधील साखर कारखाने अगदी पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातील अधिकाधिक ऊस उचलण्याचे नियोजन करायचे.
यंदा कर्नाटक सरकारने २० ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याची मुभा दिली होती. परंतु कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाला दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेऊन गुर्लापूर येथे आंदोलन केले. निपाणी सीमा भागात देखील ऊस तोडणी वाहतूक रोखण्यात आली. त्यामुळे या आंदोलनाची दखल सरकारने घेऊन उसाला ३३०० रुपये दर देण्याची घोषणा केली. त्यामुळे निपाणी व चिकोडी तालुक्यातील साखर कारखाने सुरू होण्यास विलंब झाला.त्याचा फायदा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना झाला.


















