बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने १ ते १५ डिसेंबर या दुसऱ्या पंधरवड्यात १ लाख ३० हजार ७४२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. गाळप झालेल्या उसापोटी ४३ कोटी २८ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. शासनाचे ५० रुपये वगळता कारखाना एकाच हप्त्यात ३ हजार ३१० रुपये जमा करीत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली.
मागील पंधरवड्यापोटी ५० रुपयांप्रमाणे ४२ लाख रुपये फरक रक्कम जमा केली असल्याचे सांगून एम. पी. पाटील म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने यंदा प्रति टन उसाला ३ हजार ३६० रुपये असा दर जाहीर केला. पहिल्या पंधरवड्यात ८२ हजार ९१० मेट्रिक टन ऊस गाळपापोटी २७ कोटी ३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच जमा केले आहेत.
कारखान्याकडून दुसरा हप्ता ५० रुपये आणि राज्य सरकारकडून ५० रुपये असे एकूण १०० रुपये दुसऱ्या हप्त्यात देण्याचे नियोजन होते. पण जोल्ले दाम्पत्याने शेतकरी हिताचा विचार करून पहिल्या हप्त्यातच ५० रुपये समाविष्ट करून देण्याचा निर्णय घेतला. कारखान्याने कुठलीही थकबाकी न ठेवता संपूर्ण रक्कम आदा केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे. २०२४ सालातील सभासद साखर वितरणाची मुदत ३१ डिसेंबरअखेर असून मुदतीत सभासदांनी साखर घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

















