बेळगाव : सीमाभागात खासगी व सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने गळीत हंगामाला ऑक्टोबरपासून प्रारंभ करतात. साखर कारखानदारीत ऊस वाहतूकदार व तोडणी यंत्रणा हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वच कारखान्यांना चार महिने अगोदर ऊस वाहतूकीसाठी तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. त्यामुळे कारखान्यांकडून आतापासूनच गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. अनेक कारखान्यांकडून मिल रोलर पूजनही झाले आहे. वाहतूक व तोडणी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या हालचालीचे काम कारखान्यांकडून सुरू आहे.
ऊस वाहतुकीसाठी प्रामुख्याने ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या यांच्याशी कारखान्यांकडून करार करुन घेतले जात आहेत. यापूर्वी वाहनधारकांऐवजी थेट ऊस तोडणी टोळ्यांनाच अॅडव्हान्स दिली जात होती. मात्र, टोळ्यांकडून फसवणूक वाढल्यामुळे ही पद्धत बंद झाली आहे. ॲडव्हान्स रक्कम वाहनधारकांकडून टोळ्यांना दिली जावी, अशी पद्धत साखर कारखान्यांनी अमलात आणली आहे. त्यामुळे कारखाना फक्त वाहनधारकांशी बांधील राहत असतो. तेंव्हापासून काही प्रमाणात टोळ्यांकडून फसवणूकीचे प्रमाण कमी झाले आहे. हंगामासाठी वाहनधारकांचे करार करुन घेत असताना स्थानिक वाहनांबरोबरच बीड, लातूर भागात स्थानिक मुकादमांमार्फत तोडणी – वाहतूक यंत्रणा बांधली जात आहे.