वारणानगर / पुणे : वारणानगर येथील ऊर्जांकुर श्री तात्यासाहेब कोरे वारणा पॉवर प्रकल्पास को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचा ‘सर्वोत्कृष्ट सहवीज प्रकल्प’ देश पातळीवरील पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आल्याची माहिती वारणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. वारणा कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, किशोर पाटील, उदयसिंह पाटील, श्रीनिवास डोईजड, कार्यकारी संचालक एस. आर. भगत व ऊर्जाकूरचे संचालक मंडळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कारखान्याने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे वारणा कारखाना सुस्थितीत आल्याचे आ. कोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, यापूर्वी कारखान्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. मागील वर्षी ४४ मेट्रिक वॅट क्षमतेचा को-जनरेशन प्रकल्प कारखान्याचा मालकीचा झाल्यानंतर पहिल्याच हंगामामध्ये को-जनरेशन प्रकल्पातून कारखान्याने सुमारे १५ कोटी ७२ लाख ९७ हजार ९४२ युनिट्सचे उत्पादन घेतले होते.















