पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी भीमाशंकर कारखान्याने ३,४०० रुपये दर द्यावा यासाठी सुरू केलेल्या उपोषणाबाबत त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून अंतिम हप्ता जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सोमवारी (दि. १८) सायंकाळी दिले. उपोषणाच्या सहाव्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील आणि इतर संचालकांनी प्रभाकर बांगर यांच्या मागणीवर सकारात्मक चर्चा केली जाईल व शेतकरीहिताचाच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर बांगर यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर म्हणाले की, सहकारी कारखानदारी टिकली तर शेतकऱ्यांची प्रगती होते. शेतकऱ्यांची प्रगती झाली, तर कारखान्याची प्रगती होते. प्रभाकर बांगर यांच्याशी कारखाना प्रशासनाने सकारात्मक चर्चा केली असून, कारखान्याकडून आम्हाला समाधानकारक उत्तरे मिळाल्याने आम्ही उपोषण मागे घेतले आहे, असेही ते म्हणाले.












