कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याने आगामी गाळप हंगामात ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती उपाध्यक्ष उदयसिंह पाटील – कौलवकर यांनी दिली. शाहूनगर, परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजन प्रसंगी पाटील बोलत होते. संचालक डी.आय.पाटील यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले.
पाटील म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष, आमदार पी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार पारदर्शी आणि काटकसरीने करण्यात आला आहे. सध्या साखर उद्योग अडचणीतून वाटचाल करत असून केंद्र आणि राज्य शासनाने मदतीचा हातभार लावण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, कामगार प्रतिनिधी विजय पाटील, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.


















