नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारताने २०२१-२२ च्या समान कालावधीच्या तुलनेत दुप्पट गहू निर्यात केली आहे. मे महिन्याच्या मध्यावर केंद्र सरकारने अचानक लागू केलेल्या निर्यात निर्बंधांनंतरही हा टप्पा भारताने गाठला आहे. वाणिज्य विभागाच्या आकडेवारीनुसार, भारताने एप्रिल-ऑगस्ट २०२२-२३ या कालावधीत ४२.० लाख मेट्रिक टन (एलएमटी) गहू निर्यात केला. जो गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलेत ११६.७ टक्के अधिक आहे.
फेब्रुवारीच्या अखेरीस युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे निर्यातीस प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे भारतीय गव्हाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये निर्यात १४.७१ लाख टनापर्यंत पोहोचले. जे गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात निर्यात केलेल्या २.४२ लाख टनापेक्षा ५०० टक्के अधिक आहे. केंद्र सरकारकडून १३ मे रोजी लागू केलेल्या निर्बंधानंतर त्याच महिन्यासाठी निर्यात घटून १०.७९ लाख टन झाली. मात्र मे २०२१ मध्ये निर्यात केलेल्या ४.०८ लाख टनापेक्षा १६४ टक्के अधिक आहे. यानंतर निर्यातीत घसरण झाली आहे. जून महिन्यात ७.२४ लाख टन, जुलैमध्ये ४.९४ लाख टन आणि ऑगस्ट महिन्यात ५.८० लाख टन निर्यात करण्यात आली. याऊलट जून, जुलै आणि ऑगस्ट २०२१ मध्ये अनुक्रमे ४.७५ लाख टन, ३.७५ लाख टन आणि ५.२२ लाख टन निर्यात करण्यात आली होती.
भारताने एप्रिल महिन्यात ४४ देशांना गव्हाची निर्यात केली आहे. यामध्ये बांगलादेशला सर्वाधिक ३.३५ लाख टन तर ब्रिटनला सर्वात कमी २००० मेट्रिक टनाची निर्यात करण्यात आली. भारताने जून २०२२ मध्ये ११ देशांना गव्हाची निर्यात केली आहे. तर जुलै महिन्यात केवळ इंडोनेशिया, बांगलादेश, कोरिया, संयुक्त अरब अमीरात आणि अंगोला या पाच देशांना निर्यात करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात बांगलादेश, संयुक्त अरब अमीरात, इंडोनेशिया, श्रीलंका, अफगानिस्तान, मलेशिया, तैवाना आणि भुतान या आठ देशांना निर्यात करण्यात आली आहे. निर्बंधांनंतच्या महिन्यात इंडोनेशीया हा भारतीय गव्हाचा मुख्य खरेदीदार म्हणून पुढे आला आहे. या कालावधीतील १८ लाख टन गहू निर्यातीपैकी जवळपास ७ लाख टन इंडोनेशियाला पाठविण्यात आला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीतील पाच महिन्यात इंडोनेशिया ११.१२ लाख टन तर बांगलादेश ८.०६ लाख टन निर्यात करून द्वितीय क्रमांकाचा भारतीय गहू खरेदीदार बनला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत आटा निर्यात दुप्पटीपेक्षा अधिक झाला आहे. एप्रिल-ऑगस्ट २०२१ या दरम्यान, १.६४ लाख टनाच्या तुलनेत ४.४९ लाख टन निर्यात झाली आहे. सोमालिया, संयुक्त अरब अमीरात, श्रीलंका, मादागास्कर आणि जिबुती हे मुख्य पाच देश एप्रिल-ऑगस्ट २०२२ या कालावधीत भारतीय आट्याचे खरेदीदार आहेत.














