सीतामढी : बिहार सरकारने गुऱ्हाळघर उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उद्योग मंत्री कृष्णनंदन पासवान यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकीची रक्कम देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ केला. रीगा साखर कारखाना क्षेत्रातील २६ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चेक आणि बँक ट्रान्सफरद्वारे पैसे देण्याची प्रक्रिया यावेळी सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या ध्येयासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. आगामी गळीत हंगामात ऊस लागवडीला प्रोत्साहन देण्याचे आणि उत्पादन वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री ऊस विकास योजना आणि कृषी यांत्रिकीकरण योजनेबद्दल शेतकऱ्यांना जागरूक आणि प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने लवकरच शिवहर जिल्ह्यात एक दिवसीय शेतकरी चर्चासत्र आयोजित केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी ऊस उद्योग विभागाचे सचिव बी. कार्तिकेय धनजी यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती आणि समृद्धी लक्षात घेऊन, मुख्यमंत्री ऊस विकास योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४९.०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या २६.६० कोटी रुपयांच्या तुलनेत ही तरतूद जवळजवळ दुप्पट आहे. देयक प्रक्रियेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी रिची पांडे, आयुक्त अनिल कुमार झा, जनरल मॅनेजर रीगा शुगर कंपनी लिमिटेडचे पी. देवराजुलु, सहआयुक्त जयप्रकाश नारायण सिंह उपस्थित होते.