नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कृषी कचऱ्याचे एका मौल्यवान राष्ट्रीय संसाधनात कसे रूपांतर केले जाऊ शकते, यावर प्रकाश टाकला. बायो-बिटुमेन हे विकसित भारत २०२७ च्या दृष्टिकोनासाठी एक परिवर्तनकारी पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी कचऱ्याचा वापर केल्याने, पिकांच्या अवशेषांना आग लावल्यामुळे होणारे प्रदूषण कमी होते आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. १५% मिश्रण केल्यास, भारत परकीय चलनात सुमारे ४,५०० कोटी रुपयांची बचत करू शकतो आणि आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
‘शेती अवशेषांपासून रस्त्यांपर्यंत: पायरोलिसिसद्वारे बायो-बिटुमेन’ या शीर्षकाखालील ‘सीएसआयआर’च्या तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभात बोलताना ते म्हणाले की, आजचा दिवस भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांच्या इतिहासात एक ऐतिहासिक टप्पा आहे, कारण भारत व्यावसायिकरित्या बायो-बिटुमेनचे उत्पादन करणारा जगातील पहिला देश बनला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीएसआयआर आणि त्यांच्या समर्पित शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आणि या अग्रगण्य यशामध्ये दिलेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार मानले.
मंत्री गडकरी म्हणाले की, हे नाविन्यपूर्ण संशोधन शेतकऱ्यांना सक्षम करेल, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल. ते म्हणाले की, बायो-बिटुमेन हे शाश्वत विकास, आत्मनिर्भरता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार वाढीसाठी मोदी सरकारच्या वचनबद्धतेचे खरे प्रतिबिंब आहे, जे स्वच्छ आणि हरित भविष्याचा मार्ग प्रशस्त करते.

















