जसपूर : टर्बाइनमधील तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेला नादेही साखर कारखाना सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होईल, अशी शक्यता आहे. सातव्या दिवशीही कारखान्याचे गाळप बंद राहिल्याने भारतीय किसान युनियनच्या सदस्यांनी मुख्य व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर चौथ्या दिवशीही आपले आंदोलन सुरू ठेवले. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य व्यवस्थापक विवेक प्रकाश यांची भेट घेतली. कारखाना लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सायंकाळपर्यंत काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. कारखान्याचे इंजिनीअर, कामगार टर्बाइनमधील त्रुटी दूर करण्याा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अमर उजालामधील वृत्तानुसार, जर कारखाना लवकर सुरू झाला नाही तर कर्मचाऱ्यांची ये-जा रोखण्याचा इशारा भारतीय किसान युनियनच्या सदस्यांनी दिला. मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. भारतीय किसान युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष प्रेम सहोता, अमनप्रीत सिंह, सतवीर सिंह, ओंकार सिंह, सोहन सिंह, नरेंद्र सिंह, प्रकाश चौहान, धर्म सिंह आदी उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनात सहभागी युवा तालुकाध्यक्ष अमनप्रीत सिंह यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.












