बुलढाणा : धाड- वरुड येथील पैनगंगा साखर कारखान्याकडे गेल्या ५ महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. त्याविरोधात बुधवारी ५०० ते ६०० शेतकऱ्यांनी साखर कारखान्यावर ठाण मांडले. कारखान्याने मोठ-मोठे आमिष दाखवून शेतकऱ्यांचा ऊस आणला, उसाची साखर केली, साखरेचे पैसे केले, परंतु शेतकऱ्यांचे करोडो रुपये अद्याप थकीत आहे. यातून कारखान्याचे चेअरमन समाधान डोईफोडे यांचा निष्काळजीपणा दिसतो असा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.
शेतकऱ्यांनी सांगीतले की, कारखान्याने अकोला, वाशिम, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव खान्देश, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा ऊस आणला आहे. नोव्हेंबर, डिसेंबरपासून मार्चपर्यंत ऊस आणला. कारखान्याने एक लाख पंधरा हजार मेट्रिक टन साखर उत्पादन केले. मात्र, एक पैसाही दिलेला नाही. शेतकरी गेल्या ५ महिन्यापासून कारखान्यावर चकरा मारून मारून हैराण झाले आहेत. उसाचे पैसे न मिळाल्याने कोणाच्या मुलीचे लग्न मोडले तर कोणाची आई दवाखान्यात आहे. कारखान्याच्या भरवशावर राहिलेल्या अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. आता खरीपासाठी पेरणीची वेळ आली आहे. मात्र, पैसे मिळत नसल्याचा आरोप करत शेकडो शेतकऱ्यांनी कारखान्यावर रात्री ७ वाजेपर्यंत ठाण मांडले. यावेळी कामगार सुद्धा उपस्थित होते. कारखान्यावरील कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा ६ महिन्यापासून थकीत आहे असे त्यांनी सांगितले.