बुलढाणा : कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर आंदोलनाचा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा इशारा

बुलढाणा : सध्या शेतीमालाला हमीभाव नाही, नुकसान भरपाई मिळत नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीच उपाययोजना नाही तर दुसरीकडे शेतकरी पुत्रांच्या हाताला काम नाही, अशी खंत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या हक्कांसाठी तडजोड करणार नाही. शासनाला जागे करण्यासाठी कर्जमाफी, उर्वरित पीकविम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना राज्यभर आंदोलन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

जांभूळधाबा (ता. मलकापूर) येथे संघटनेच्यावतीने आयोजित एल्गार मेळाव्यात तुपकर म्हणाले की, सरकार जर शेतकरी शेतमजूर आणि सर्व सामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित करणार असेल, तर रस्त्यावर उतरुन दिल्लीपर्यंतचा आवाज बुलंद केला जाईल. एकिकडे फळबागा लावायला सरकार सांगते, पण फळबागांचा पीकविम्यात समावेश नाही हे धोरण कसे आहे? असा सवाल तुपकर यांनी यावेळी केला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल राऊत, सचिन शिंगोटे, गजानन भोपळे, हर्षल मोरे, अमोल मोरे, आकाश माळोदे, नीलेश गवळी, उमेश राजपूत, बंडू देशमुख, परमेश्वर मोरे, निखिल पाटील, रामा गावंडे, प्रतिक पाटील, धनराज पाटील, कुशल सोनवणे, महादेव मोरे, सारंग झांबरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here