नवी दिल्ली : भारतीय कृषी संशोधन परिषदेत (ICAR) ऊस संशोधन आणि धोरणासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. ऊस विकासावरील एका चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले की, हा उपक्रम शेतकरी आणि साखर उद्योगाला भेडसावणाऱ्या व्यावहारिक समस्यांवर लक्ष केंद्रित करेल. सध्या २३८ प्रजातीचा ऊस लाल सड रोगास बळी पडत आहे. त्यामुळे एकल पीक घेण्याचे धोके कमी करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. डाळी आणि तेलबियांसारख्या पिकांसह आंतरपीक घेण्याचा विचार शेतकऱ्यांनी करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी मंत्री चौहान यांनी उत्पादन खर्च कमी करणे, यंत्रसामग्री वाढवणे, साखर उतारा दर सुधारणे, कार्यक्षम सिंचन, जैविक उत्पादने आणि मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करून खतांवर अवलंबून राहणे कमी करणे यावर भर दिला. ते म्हणाले की, कारखान्यांना अडचणी येत असतानाही त्याचा मुख्य भार शेतकऱ्यांवर पडतो. कृषी कामगारांची कमतरता आहे. यासाठी प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि यंत्रसामग्री वाढवण्याची गरज आहे. मी आयसीएआरला ऊस संशोधनासाठी एक विशेष पथक तयार करण्यास सांगितले आहे. ते व्यावहारिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करेल. शेतकरी आणि उद्योग या दोन्ही घटकांना संशोधन फायदेशीर ठरले पाहिजे. यावेळी आयसीएआरचे महासंचालक आणि डीएआरईचे सचिव डॉ. एम. एल. जाट यांनी चार प्रमुख संशोधन प्राधान्यांवर प्रकाश टाकला. उपमहासंचालक (पीक विज्ञान) डॉ. देवेंद्र कुमार यादव , आयसीएआरचे डॉ. राजबीर सिंग यांनीही चर्चासत्रात आपले विचार मांडले.