नवी दिल्ली : केंद्र सरकारने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमईएस) निकषांमध्ये बदल केला आहे. या खात्याचे मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की, सरकार आता किरकोळ-घाऊक व्यापाऱ्यांना एमएसएमईचा दर्जा देईल. या निर्णयाचा फायदा देशातील २.५ कोटी लोकांना होणार आहे. या व्यापाऱ्यांना लघू उद्योगाचे सर्व लाभ मिळतील.
आमच्या सरकारने किरकोळ-घाऊक व्यापाऱ्यांना एमएसएमई दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐतिहासिक पाऊल आहे. याचा कोट्यवधी व्यापाऱ्यांना आर्थिक सह विविध लाभ मिळविण्यासाठी वापर होईल. त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन या निर्णयाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना मजबूत करीत आहोत. हे सर्व उद्योग आर्थिक प्रवाहात येतील असे त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयाने २५० कोटी रुपयांपर्यंत व्यापार करणारे छोटे घाऊक, किरकोळ व्यापाऱ्यांना तातडीने लाभ मिळेल. व्यापारी संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापूर्वी २०१७ मध्ये सूक्ष्म, लघू उद्यम क्षेत्रातील काही नियम बदलण्यात आले होते.


















