पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पैशांची बचत करून सभासदांना राज्यातील सर्वोच्च भाव देण्याचा माझा प्रयत्न असेल. मीच आगामी पाच वर्षे माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष असेन,” अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराचे रणशिंग त्यांनी फुंकले. बारामतीत शनिवारी नीलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. पुढील पाच वर्षे राज्यातील चांगला भाव दिला नाही तर अजित पवार नाव सांगणार नाही, असे आव्हानच त्यांनी विरोधकांना दिले. ज्या दिवशी मला अस वाटेल की माझ्यापेक्षा उजवा उमेदवार आहे, त्या दिवशी मी आपणहून बाजूला होईन, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी छत्रपती कारखान्याप्रमाणेच ‘माळेगाव मध्ये माझ्या नेतृत्वाखाली संचालक मंडळासाठी आचारसंहिताच असेल, असेही जाहीर करत कारखाना राज्यातील सर्वोत्तम करण्याची ग्वाही सभासदांना दिली. चंद्रराव तावरे यांचा नामोल्लेख टाळून पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार या चेहऱ्याकडे बघून सभासदांनी मतदान करावे, गटतट विसरुन जात कारखान्याच्या सर्वांगिण विकासाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, विरोधक प्रचारासाठी मुद्दे नसल्याने काहीही बरळू लागले आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी मी राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी आणला त्या संस्था मी मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जातो. याप्रश्नी समोरासमोर येऊन चर्चा करावी.
‘माळेगाव’चा चेअरमन तावरेच ठरवणार : ॲड.कोकरे
‘माळेगाव’चा सभासद सुज्ञ आहे. २२ हजार सभासदांपैकी एक माळेगावचा चेअरमन होणार आहे. पुढील चेअरमन आमचे नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे हेच ठरवणार आहेत, असा विश्वास सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख ॲड. शामराव कोकरे यांनी व्यक्त केला. सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या सभेत ॲड. कोकरे यांनी सत्ताधाऱ्यांना अध्यक्षपदाच्या मुद्यावर लक्ष्य केले. मेखळी, घाडगेवाडी येथील विरोधकांच्या सभांमध्ये चेअरमनपदाच्या मुद्यांवर जोरदार टीका करण्यात आली. सभासदांनी छत्रपतीच्या अजित पवार यांच्या ताब्यात कारखाना दिला. त्यामुळे पवारांनी प्रथम त्या सभासदांना राज्यात उच्चांकी ऊस दर देवून न्याय द्यावा, असा टोला त्यांनी लगावला.
कोकरे म्हणाले की, तुम्ही लोकसभा, विधानसभा लढवायची आणि आता कारखान्याच्या निवडणुकीतही उतरायचे हे तुम्ही कधी थांबणार हे अगोदर सांगा. माळेगावची निवडणूक झाल्यानंतर बहुमताच्या आधारे संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदाची निवड होती. परंतु अजित पवार यांनी स्वतःच चेअरमन पदी मी असणार आहे, असे घोषित केले. सहाजिकच त्यांच्या या भूमिकेने निवडून येणाऱ्या संचालकांवर एक प्रकारे अन्याय होणार आहे. कारखान्याचा कारभार सभासदांच्या हिताचा व्हायला हवा. मात्र, गेल्या अनेक वर्षात तसे घडलेले नाही. त्यामुळे सभासद आमच्याच पॅनलच्या पाठीशी राहातील असा विश्वास कोकरे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी युवराज तावरे यांचे भाषण झाले. यावेळी सतीश घाडगे यांनी सहकार बचाव पॅनेलला पाठिंबा दिला.