महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस सुरू आहे. काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. मात्र, शेतकऱ्यांना सध्या चांगल्या पावसाची गरज आहे. कारण खरीप पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान विभागाने वर्तवलेल्या पुर्व अंदाजानुसार, राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. बहुतांश विभागात पुरेसा पाऊस झालेला नाही. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. आता राज्यात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच १४ सप्टेंबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर नाशिक ते कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. बंगालच्या उपसागरात दोन नवीन चक्राकार वाऱ्याची यंत्रणा निर्माण होऊ शकते. दोन्ही वेळी ते कमी दाबाच्या क्षेत्रात बदलू शकते. पावसाची शक्यता आहे.
यंदा मान्सून उशिरा आला आणि जून महिना कोरडाच राहिला. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. मात्र, ऑगस्ट महिनाही कोरडाच राहिला. राज्यातील ४५३ महसूल विभागात २१ दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस झाला आहे, तर ६१३ महसूल विभागात १५ ते २१ दिवसांपासून पाऊस नाही. त्यामुळे या भागात पिकांची अवस्था बिकट असल्याचे चित्र समोर येत आहे.















