छत्रपती संभाजीनगर : ऊस तोड कामगाराचा अपघातात मृत्यू, भरपाईच्या मागणीसाठी संघटनांचा ठिय्या

छत्रपती संभाजीनगर : डोंगरेवाडी (ता. वडवणी, जि. बीड) येथील गणेश नामदेव डोंगरे (वय ३२) हे पत्नी अश्विनी यांच्यासह गेल्या काही महिन्यांपासून समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्यात ऊस तोडीचे काम करत होते. गेल्या आठवड्यात शनिवारी दुपारी वजनकाट्यावर ऊस मोजणीसाठी गेले असताना अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ऊसतोड कामगाराचा अपघाती मृत्यू होऊनही संबंधित कारखाना प्रशासनाने कोणतीही ठोस मदत जाहीर न केल्याने संतप्त कामगार संघटनांनी बिराजदार साखर कारखान्याच्या गव्हाणीत लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कृष्णा तिडके, तुळजाभवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

वजनाट्याजवळ उसाने भरलेल्या बैलगाडीच्या बाजूला भरत आश्रूवा डोंगरे, गणेश डोंगरे व बाबा नवनाथ नागरगोजे हे तिघे बसले होते. यावेळी एका ट्रॅक्टरने बैलगाडीला धडक दिल्याने बैलगाडीवरील ऊस तिघांच्या अंगावर कोसळला. या भीषण अपघातात गणेश डोंगरे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतरही कारखाना प्रशासनाकडून कोणतीही तातडीची मदत जाहीर न केल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृताच्या कुटुंबाला दहा लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी संघटनांनी कारखान्याचे कामकाज दिवसभर ठप्प पाडले. सध्या संघटना आणि कारखाना प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनांनी दिला. तर क्युनर्जी इंडस्ट्रीज लि. व बिराजदार कारखान्याच्या माध्यमातून आम्ही यापूर्वीच मदत देण्याचे कबूल केले आहे. आवश्यक त्या प्रक्रियेनंतर योग्य मदत केली जाईल, असे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here