छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. पवार यांच्या आठवणींनी अनेकजण भावूक झाले. साखर उद्योगासाठी पवार यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे उमरगा – लोहारा तालुक्यांतील लोकांसोबत विशेष ऋणानुबंध होते. येथील नागरिक, कार्यकर्त्यांचे शरद पवारांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते टिकविण्यासाठी अजितदादांनी कायम प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी मोठ्या संघर्षातून समुद्राळ येथे उभारलेला भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना काही वर्षांपूर्वी दुष्काळ व बँकेमुळे अडचणीत होता. कारखान्याचे अध्यक्ष प्रा. बिराजदार यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना माहिती सांगितली, तेव्हा पवार यांनी कारखान्याला मदत केली आणि नवसंजीवनी मिळाली. विविध प्रकारे मदत केली. यातून यंदा या कारखान्याचा सातवा गळीत हंगाम सुरळीत आहे.
याबाबत प्रा. सुरेश बिराजदार यांनी सांगितले की, कारखान्याच्या अडचणींविषयी भेटल्यानंतर अजितदादांनी काळजी करू नका, असे सांगत मदत केली. शेतकरी व सभासदांना न्याय देण्याचा शब्द दिला. उसाला सर्वाधिक भाव देऊ, असा केलेला संकल्प त्यांनी पूर्ण केला. ‘क्यूएनर्जी’च्या माध्यमातून कारखान्याची गाळप क्षमता वाढली. उपपदार्थ निर्मितीचा प्रकल्पही हाती घेतला. यातून कारखान्याने यंदा २,८०० रुपये प्रतिक्विंटल पहिला हप्ता दिला आहे. कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी केलेली मदत शेतकरी कधीही विसरणार नाहीत. कारखान्याच्या कामांच्या पाहणीसाठी ते अचानकपणे सकाळी सहाला यायचे. आढावा घेऊन काही सूचना करून ते जायचे. यामुळे कारखान्याचा हंगाम लवकर सुरू झाला. ऊर्जामंत्री असताना त्यांनी तालुक्यात शेतकऱ्यांसाठी अधिक क्षमतेने वीज पुरवठा होण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून उपकेंद्र वाढविण्यासाठी मदत केली. रस्ते विकासकामांसाठी त्यांनी विशेष निधी दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले सोलर सिस्टीम व सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन, बलसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाच्या भूमिपूजनासाठी ते येणार होते. मात्र, हा सोहळा झालाच नाही.

















