छत्रपती संभाजीनगर : आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेऊन त्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील-डोणगावकर यांनी केले आहे. आमदारांनी कारखान्याच्या सत्तेत सहभागी होऊन पालकत्व स्वीकारावे आणि कारखान्याचे व्यवस्थापन आपल्या ताब्यात घ्यावे. यासाठी आमदारांची तज्ज्ञ संचालकपदी निवड केली जाईल आणि स्वतः कारखान्याच्या चेअरमनपदाचा राजीनामा देईन. तुमच्या आवडत्या व्यक्तीला चेअरमनपदी बसवा, असा सल्लाही त्यांनी आमदारांना दिला आहे. याबाबत चेअरमन डोणगावकर यांनी आमदारांना खुले पत्र लिहिले आहे.
कृष्णा पाटील-डोणगावकर यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात. आपल्या पक्षाचे राज्यात, केंद्रात सरकार आहेत. सहकारमंत्री आपले ऐकतात. तुम्ही कारखान्यात लक्ष घालणार असल्याचे आम्हाला समजले आहे. मात्र तक्रारीपुरते लक्ष न घालता कारखाना आपल्या ताब्यात घ्या. अभियांत्रिकी शिक्षण घेतले असल्याने तज्ज्ञ संचालक म्हणून आपली नेमणूक तत्काळ करता येईल. चेअरमनपदाचा मी स्वतः राजीनामा देऊन आपल्या आवडीच्या व्यक्तीला चेअरमनपदी बसवावे. संस्थेचा ताबा आपण घ्यावा. कारखान्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेबरोबर झालेल्या एक वेळ समझोता योजना २०१३ नुसार कर्ज मिटू शकते. विक्रीकर विभागाचे अभय योजनेतील कारखान्याचा अर्ज निकाली काढण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत होऊ शकते. कारखान्याची बंद उपसा जलसिंचन योजना शासनाच्या आर्थिक मदतीने चालू करता येईल. राज्य शासन सत्ताधारी मंडळीच्या साखर कारखान्याना जशी मदत करत आहे, तशीच मदत कारखान्याला मिळू शकते. त्यामुळे कारखान्याचा ताबा घ्यावा, असे आवाहन डोणगावकर यांनी केले आहे.