छत्रपती संभाजीनगर : सध्या ऊस गळीत हंगाम जोमात सुरू आहे. ऊस तोडणीसाठी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि अहिल्यानगर या भागांतून हजारो ऊसतोड कामगार स्थलांतरित झाले आहेत. मात्र, त्यांची मुले शिक्षणाविना राहात असल्याचे दिसून आले आहे. साधारण ५ ते ६ महिने चालणाऱ्या या हंगामात मुले शाळेपासून पूर्णपणे दुरावतात. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आज ठिकठिकाणी ही मुले उघड्यावर, पालात किंवा उसाच्या फडात खेळताना दिसतात. मोठी मुले अनेकदा नाईलाजास्तव पालकांना कामात मदत करू लागतात, तर लहान मुले धाकट्या भावंडांना सांभाळण्यात दिवस घालवतात. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ‘साखरशाळा’ हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्ष त्याची कोणतीही प्रभावी अंमलबजावणी दिसत नाही.
सध्या साखर कारखाना क्षेत्रांमध्ये ऊस तोडणीची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. ऊस तोडणी मजूर या कामात गुंतले आहेत. आई-वडील ऊस तोडणीसाठी निघाले की, घरी मुलांची देखभाल करण्यासाठी कोणीही नसल्याने त्यांना आपल्या चिमुकल्यांना सोबत न्यावे लागते. यामुळे मुलांचे चालू शैक्षणिक वर्ष अर्ध्यावरच खुंटते. मुले शाळेपासून पूर्णपणे दुरावतात आणि शिक्षणापासून वंचित राहतात, अशी स्थिती आहे. याबाबत कन्नड तालुक्यातील तांदूळवाडी येथील कामगार वाल्मिक गांगुर्डे यांनी सांगितले की, आम्ही ज्या ठिकाणी ऊसतोडीला जातो. तेथे आम्हालाच राहण्याची व्यवस्था करावी लागते. सुविधा मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाही. सरकारने केवळ हंगामी शाळा चालवून भागणार नाही, तर या मुलांच्या निवासाची आणि कायमस्वरूपी शिक्षणाची सोय त्यांच्या मूळ गावी करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
















