छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील विनायक सहकारी साखर कारखाना गेल्या २०-२२ वर्षांपासून बंद असल्याने स्थानिक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. हा कारखाना त्वरित सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके, एल.एम. पवार आणि आबासाहेब साळुंके यांनी मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, कारखाना बंद असल्याने ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना इतर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढून ऊस लागवड क्षेत्र लक्षणीयरीत्या घटले आहे. तसेच, कारखान्यातील शेकडो कामगारांचे अनेक वर्षांचे वेतन थकीत आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. भंगार चोरी आणि यंत्रसामग्री निकामी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कारखान्याची प्रशासकीय आणि वित्तीय प्रक्रिया त्वरित सुरू करून सहा महिन्यांत गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात १९ सहकारी कारखान्यांचे पुनरुज्जीवन यशस्वी झाल्याचा संदर्भ देत, सहकार विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.
…या आहेत मागण्या
शासनाने यंत्रसामग्री दुरुस्ती, ऊस खरेदी आणि गाळप सुविधांसाठी विशेष निधी योजना जाहीर करावी. राज्य सहकारी बँकेच्या कर्जमाफी किंवा पुनर्गठनाची तरतूद करावी. कारखान्याचे भागधारक, ऊस उत्पादक, कामगार प्रतिनिधी आणि स्थानिक आमदार-खासदार यांचा समावेश असलेली समिती गठित करून ठोस आराखडा तयार करावा. बंद काळातील कामगारांचे वेतन, भविष्यनिधी आणि इतर लाभ तत्काळ वितरित करावेत, आदी मागण्या मंत्री पाटील यांच्याकडे केल्या आहेत.












