छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी आतापर्यंत १५,७१,१४४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १३,३९,०८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.८८ टक्के आला आहे. यावर्षी मात्र पाच खासगी व तीन सहकारी साखर कारखाने जोमाने ऊस गाळप करीत आहेत. तांत्रिक कारणामुळे सिल्लोडचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकला नाही, तर फुलंब्रीचा देवगिरी सहकारी साखर कारखाना यावर्षीच ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. चांगला मान्सून आणि धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे गोदावरी तीरावर उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
यावर्षी जिल्ह्यात साखर उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ अपेक्षित आहे, असे ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य दामोदर नवपुते यांनी सांगितले. जिह्यात आतापर्यंत जास्त म्हणजे चार लाख ३३ हजार ४४० मेट्रिक टन उसाचे गाळप करून तीन लाख ७३ हजार ६९० क्विंटल साखरेचे उत्पादन करून महालगावचा पंचगंगा शुगर हा पहिला खासगी साखर कारखाना ठरला आहे. खालोखाल कन्नडच्या बारामती अँग्रोने तीन लाख ८३ हजार ४२० मेट्रिक टन उसाचे गाळप करून तीन लाख ७९ हजार २०० क्विंटल साखरेचे क्विंटल साखरेचे उत्पादन काढले आहे. साखर उतारा सरासरी ७.०४ टक्के आला आहे. मुक्तेश्वर शुगर-गंगापूर, बारामती अँग्रो-कन्नड, छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग-चित्ते पिंपळगाव, घृष्णेश्वर शुगर-खुलताबाद, पंचगंगा शुगर -महालगाव, वैजापूर या पाच खासगी कारखान्यांसह जय हिंद शुगर- गंगापूर, सचिन घायाळ शुगर -संत एकनाथ कारखाना, पैठण आणि रेणुकादेवी कारखाना-विहामांडवा यांच्याकडून गतीने गाळप सुरू आहे.

















