छत्रपती संभाजीनगर : ऊसतोडीच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण; बाँड लिहून दिल्यावर झाली सुटका

छत्रपती संभाजीनगर : ऊस तोडणीचे पैसे न दिल्याच्या रागातून कांचनवाडी येथून शेतकरी विलास गोविंद चव्हाण (३५, रा. गिरनेर तांडा) यांचे सहा जणांनी अपहरण केल्याचा प्रकार घडला. चव्हाण यांच्या भावाने अपहरणकर्त्यांना ४० हजार रुपये व उर्वरित पैसे देण्याचा करारनामा करून दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी सातारा पोलिस स्थानकात अचिन जयंत चव्हाण, सचिन चव्हाण (रा. भासूनाई तांडा, ता. अंबड) या दोघांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आपली सुटका करून घेतल्यानंतर शहरात परतल्यानंतर विलास यांनी रुग्णालयात उपचार घेऊन सातारा पोलिसांकडे तक्रार केली. उपनिरीक्षक गोविंद एकिलवाले तपास करीत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, संशयित सचिन व अचिनसोबत विलास यांचा भाऊ विकास चव्हाण यांचा ऊस तोडणीचा व्यवहार आहे. १५ मार्च रोजी वळदगाव परिसरात मिरची विकून ते दुचाकीने कांचनवाडीकडे जात होते. रस्त्यात चारचाकीतून आलेल्या चौघांनी उतरून त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवून अपहरण केले. यावेळी विलास यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आले. झाल्टा फाटा परिसरात सचिन व अचिनने त्यांना ‘आमचे पैसे का देत नाही’ असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर अंबड तालुक्यातील भासूनाईक तांड्यावरील एका शेडमध्ये डांबले. १६ मार्चला सकाळी विलास यांचा भाऊ विकासने तत्काळ ऑनलाईन ४० हजार रुपये पाठविले. उर्वरित पैसे देण्यासाठी करारनामा केल्यावर विलास यांची सुटका करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here