छत्रपती संभाजीनगर : राज्यात ऊस गाळप हंगामाची तयारी जोरात सुरू झाली आहे. दसरा झाला असून आता दिवाळीच्या हंगामात बऱ्याच ऊस कारखान्याचे धुराडे पेटू लागले आहेत. ऊस तोडणीसाठी मजूर मिळविण्यासाठी मुकादमांची धावपळ सुरू झाली. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे मजूरच मिळत नसल्याने मुकादम तसचे, कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वैजापूर तालुक्यातील खेडोपाड्यांसह वाड्या-वस्त्यांवर चकरा वाढल्या आहेत. त्यामुळे मजुरांची लगबग सुरू झालेली दिसत आहे. मुकादम आता या मजुरांच्या शोधासाठी बाहेर पडले आहेत. आपल्या गाड्यांमध्ये बसवून किंवा ट्रक पाठवून असे मजूर शिवारामध्ये नेऊन सोडले जात आहेत.
वैजापूर तालुक्यातील मन्याडखोरे भागातील मजूर तसेच डोंगरथडीमधील नगर, संगमनेर, पुणे, कोपरगाव, बारामती परिसरात ऊस तोडणीसाठी दरवर्षी जातात. काही मजूर गुजरातमधील साखर कारखान्यांकडे जातात. त्यांना प्रती ऊस कोयता तीस ते पन्नास हजार रुपये आगाऊ दिले जातात. तालुक्यातील अनेक आदिवासी पट्ट्यांतूनही मजूर ऊस तोडणीसाठी जाऊ लागले आहेत. यावर्षी निवडणुकीची रणधुमाळी व पावसाळा अजूनही हजेरी लावत असल्यामुळे बऱ्याच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आठवडा किंवा पंधरवड्यापर्यंत ऊसतोडणी लांबण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही खासगी कारखाने यातून मार्ग काढून ऊसतोडणी सुरू ठेवत दररोजचे गाळप करत असतात. त्यासाठी आता मजुरांची शोधाशोध मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे.









