छत्रपती संभाजीनगर : साखर कारखाने सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी अद्याप दर जाहीर न झाल्याने आक्रमक झाले आहेत. कारखानदारांनी उसाचा दर तातडीने जाहीर करून पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार रुपये द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली मुळे यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चालू हंगामात उसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक कारखान्यांनी अद्याप उसाचा पहिला हप्ता किती देणार, हेही स्पष्ट केलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी साखर कारखानदारांची तातडीने बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मुळे यांनी केली आहे. येत्या पंधरा दिवसांत ऊस बिलाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

















