छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ऊस पिकावर अचानक केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या रोगामुळे ऊस पीक पिवळे होऊन वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. खोडवा पिकात सुरुवातीच्या फुटव्यात केवडा जास्त आढळतो. केवड्यामुळे उसाच्या पानावर सुरवातीस पिवळसर किंवा पांढऱ्या रेषा समांतर रेषेत दिसून येतात. यामुळे पानांचे प्रकाश संश्लेषण कार्य मंदावते. लोह आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे केवडा रोग ऊस पिकात आढळतो. चुनखडीयुक्त जमिनीत याचे प्रमाण जास्त दिसून येते. परिणामी उसाच्या संख्येवर व पर्यायाने उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उस लागवडीला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. मशागत करून नवीन वाणांची लागवड करण्यात आली आहे. महागडी खते व औषधांची फवारणी करूनही पिकावरील केवडा रोग कमी होत नाही. या रोगामुळे ऊस पीक उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी विभागाने तातडीने पाहणी करून मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत अंबड तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांनी सांगितले की, चुनखडीयुक्त जमिनीत लागवडीवेळी फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट प्रत्येक एकरी १० किलो मात्रा शेणखतात मिसळून द्यावी. उभ्या पिकात केवडा आढळल्यास ५०० ग्रॅम फेरस सल्फेट + ५०० ग्रॅम झिंक सल्फेट + २ किलो युरिया + १०० लिटर पाणी या मिश्रणाच्या दोन ते तीन फवारण्या कराव्या.

















