छत्रपती संभाजीनगर : माँ बागेश्वरी साखर कारखान्याच्या युनिट -२ चा मोळी टाकून वाढीव गाळप क्षमतेचा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, गाळप क्षमता वाढवण्यात आली असून दुपटीने उसाचे गाळप होणार आहे. दररोज १० हजार मेट्रिक टन ऊस गाळप होणार असल्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी सांगितले.
जाधव म्हणाले की, बागेश्वरी कारखाना सुरळीत सुरू असून दररोज गाळत क्षमता ५ हजार मॅट्रिक टन होती, ती आता दुपटीने म्हणजे १० हजार मेट्रिक टन दररोज क्षमता करण्यात आली आहे. या वाढीव गाळप क्षमतेचा प्रारंभ ५ डिसेंबरपासून करण्यात येत आहे. क्षेत्रात एकूण ११ हजार ८६१ हेक्टर उसाचे क्षेत्र आहे यापैकी आतापर्यंत १ लाख २७ हजार ७६५ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून १ एक लाख १२ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून उतारा १०.२२ आज अखेर ९.०९७टक्के आला आहे. उपरोक्त उत्पादनाचा विचार करता कार्यक्षेत्रात ११ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपास उपलब्ध होईल.
चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की उसाचा हमीभाव २९०० रुपये देण्यात येणार आहे. पहिला हप्ता २५०० रु. दुसरा हप्ता जूनमध्ये २०० रुपये, तर तिसरा हप्ता दिवाळीला २०० रुपये प्रमाणे अदा करण्यात येईल. याबरोबरच रिकव्हरी अधिक आल्यास उसाचा दरही अधिक देण्याचा कारखाना प्रशासन प्रयत्न करील. शेतकऱ्यांनी घाई न करता बागेश्वरीला ऊस द्यावा. एकही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.


















