छत्रपती संभाजीनगर : यंदा जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्याने वर्षभर पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचा परिणाम या भागातील ऊस लागवडीवर दिसत आहे. टाकळी पैठणसह परिसरातील खरीप हंगामातील ऊस लागवडीला विशेष वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी थेट धरणातून किंवा मुख्य कालव्यांमधून पाइपलाइन टाकून सिंचन व्यवस्था अधिक प्रभावी केली आहे. लागवडीसाठी उसाच्या बेण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून, अनेक शेतकरी ३ हजार रुपये प्रति गुंठा या दराने बेणे विकत घेऊन लागवड करत आहेत. सध्याच्या लागवडीत उसाचा ‘२६५’ वाण सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे.
पैठण तालुक्यातील अनेक शेतकरी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा (ड्रिप इरिगेशन) वापर करत आहेत. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत, खतांचे थेट मुळांपर्यंत पोचणे आणि उसाच्या वाढीचा वेग वाढतो. याबाबत तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी सांगितले की, यंदा जायकवाडी धरण “शंभर टक्के भरलेले आहे. शिवाय ऊस हे नगदी पीक आहे. यामुळे शेतकरी वर्गाचा ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येत आहे. तर टाकळी पैठणचे शेतकरी रघुनाथ जाधव यांच्यामते अनेक शेतकरी उसासोबत आंतरपिके घेत आहेत. आंतरपिके घेतल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते. मी तीन एकर उसाची लागवड केली असून आंतरपीक म्हणून कांदा घेत आहे. त्यामुळे उत्पादनात दुप्पट फायदा होतो. दरम्यान, दिवसा विनाखंड वीज पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.


















