धानोरा : अंबाजोगाई तालुक्यात मांजरा नदीकाठचा भाग हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात ६० ते ७० टक्के क्षेत्रावर ऊस शेती आहे. मांजरा पट्ट्यातील शेतकरी उसाला नगदी पीक म्हणून प्राधान्य देतात. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नदीकाठचा ऊस मोठ्या प्रमाणात धोक्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडला आहे. तसेच ऊसावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. आता पावसाने उसंत घेतल्याने धानोरा खुर्द परिसरात ऊस तोडणीला सुरवात झाली आहे. परिसरातील शेतांमध्ये तोडणी यंत्रांचा आवाज आणि बैलगाड्यांची वर्दळ पुन्हा दिसू लागली आहे.
मांजरा नदीकाठच्या परिसरात यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन शेती पूर्णपणे हातातून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता ऊस उत्पादनावरच सर्वांची भिस्त आहे. हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणी मजूर दाखल झाल्याने परिसर गजबजला आहे. सध्या नॅचरल शुगर रांजणी कारखाना, येडेश्वरी साखर कारखान्याच्या ऊस तोडण्या जोरात आहेत. महापुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तटबोरगावचे शेतकरी रामकिसन शितोळे म्हणाले की, पुरामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणून साखर कारखान्यांनी मांजरा नदीकाठच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीला प्राधान्य द्यावे ही आमची विनंती आहे. दरम्यान, या भागातील अनेक गुळ कारखानेही सुरू झाले आहेत.












