छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील नवगाव शिवारात रविवारी विद्युत वाहिनीच्या घर्षणाने ठिणग्या पडून ऊस पिकाच्या फडात आग लागली. यात १५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतातील जवळपास शंभर एकराहून अधिक क्षेत्रावरील तोडणीस आलेला ऊस जळून खाक झाला. रविवारी ऊसतोड बंद असल्याने बहुतांश शेतकरी गावात होते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतकऱ्यांचे अंदाजे आठ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पैठण डावा कालवा ते नवगाव रस्त्यावर असलेल्या जलद विद्युत वाहिनीच्या घर्षणाने शोभाबाई बबन गव्हांदे यांच्या गट क्रमांक ५११ मधील उसाने पेट घेतला. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी साडेसात वाजता आटोक्यात आली. सकाळी अकरा वाजेला लागलेली ही आग नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न केले. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर होते, त्यांनी उसाच्या फडांभोवती रोटाव्हेटर मारून आग व गवत पाचटाचा संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगराचे तास टाकून आगीची सीमा निश्चित केली.
अनेक शेतकऱ्यांनी टँकरने पाणी, तर काहींनी सौर ऊर्जेवरील पंप सुरू करून पाटाने पाणी सोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. इतरांनी उसाचे वाडे आणि झाडाच्या फांद्यांच्या मदतीने आग रोखण्याचा प्रयत्न केला. उसाचे क्षेत्र असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. परंतु ते निष्फळ ठरले. रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीत शोभाबाई गव्हांदे, (आठ एकर), शोभा राजू पवार (अडीच एकर), दत्ता थोरात (एक एकर), रावसाहेब चौधरी (दीड एकर), दिलावर वजीर पठाण (आठ एकर ऊस व एक सौर ऊर्जा), सोनाबाई कचरू पराळे (पाच एकर), डॉ. मधुकर ताकपीर (आठ एकर), डॉ. राजेंद्र कबाडे (अकरा एकर) आणि नंदू लाड (चार एकर) यांसह अनेक शेतकऱ्यांचा उभा ऊस जळून कोळसा झाला.
शेतकऱ्यांना अश्रू अनावर….
या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. ‘दुष्काळात तेरावा महिना’ असे संकट उभे ठाकल्याने, तातडीने पंचनामा करून शासनाने आर्थिक मदत करावी, अशो मागणी संतप्त शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी तलाठी आणि पोलिस विभागाकडे केली आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सुनील वाघमारे आणि महावितरणचे श्री. झांजे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तहसील कार्यालयास घटनेची प्राथमिक माहिती कळवली, मंडळाधिकारी सुनील वाघमारे यांनी सांगितले की, सोमवारी (ता. १) या घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला जाईल आणि नुकसानीचा सविस्तर अहवाल तातडीने तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात येईल.


















