छत्रपती संभाजीनगर : गेल्या १४ वर्षांपासून बंद असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रशासकीय मंडळाच्या हालचालींना वेग आला आहे. कारखान्यावरील अवसायक काढून शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ नियुक्त केले जाणार आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. विविध मार्गांनी कारखान्याकडे निधी आल्याने तो कर्जमुक्त होत आहे. यामुळे कारखान्यावरील अवसायक हटवून शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ येण्याच्या हालचालीला वेग आला आहे.
देवगिरी सहकारी साखर कारखान्याची सन १९९२-९३ मध्ये स्थापन करण्यात आली होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कारखाना महत्त्वाचा मानला जात होता. कारखान्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रोजगार निर्माण झाला होता. नंतर राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे कारखाना डबघाईस आला. १४ वर्षांपूर्वी, २०१०- ११ मध्ये कारखान्याचा शेवटचा गळीत हंगाम झाला. नंतर कारखान्याला घरघर लागली. तो कर्जाच्या खाईत बुडाला. कारखान्याची सावंगी परिसरामधील जमीन समृद्धी महामार्गात गेल्याने मोठा मोबदला कारखान्याला मिळाला. चौका परिसरातील काही जमीन विकून कारखान्यावरील कर्ज फेडण्यात आले आहे. त्यामुळे अनुराधा चव्हाण यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर देवगिरी सहकारी साखर कारखान्याला प्राधान्य दिले आहे. प्रशासकीय मंडळात कोणाची वर्णी लागणार, याकडे फुलंब्री तालुक्याचे लक्ष लागले आहे.