छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात संत एकनाथ, सचिन घायाळ व रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवा या दोन्ही ही साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. मात्र अतिवृष्टीमुळे शेतात ट्रॅक्टर उत्तरवणे अवघड झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे. साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असला तरी सध्या फक्त रस्त्यालगतचा ऊस तोडला जात आहे. रस्त्यावरील ऊसही कारखान्यापर्यंत पोचवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड खर्च करावा लागत आहे. सुरवातीपासूनच वाढत्या वाहतूक खर्चामुळे ऊस हंगामात नफा मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यातच उसाचा पहिला हप्ता किती मिळेल, याबाबत अनिश्चितता असून शासनाची अतिवृष्टी मदतही अद्याप पूर्णपणे पोचली नाही.
मुख्य रस्त्यालगतच्या ऊस उत्पादकांनाही वाहतुकीच्या नावाखाली एकरी दहा हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. एखादे वाहन शेतात अडकले की बाहेर काढण्यासाठी दोन ट्रॅक्टर किंवा जेसीबी लावावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी ऊसतोड कामगारांना थेट पैसे देऊन ऊस वाहतुकीचा मार्ग निवडत आहेत. शेतकऱ्यांचा ऊस शेतातच अडकून राहू नये, यासाठी कारखाना प्रशासनाने पुढाकार घेऊन योग्य नियोजन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. घायाळ शुगर कंपनीचे चेअरमन सचिन घायाळ यांनी सांगितले की, संत एकनाथ साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केला आहे. यंदा असलेले तीन लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यालाचा ऊस द्यावा. तर विहामांडवा येथील रेणुका देवी शरद सहकारी कारखान्याचे व्हाइस चेअरमन नंदू पठाडे म्हणाले की, कारखान्याच्या गळीत हंगामाला आमदार तथा चेअरमन विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात करण्यात आली आहे.












