पुणे : “छत्रपती साखर कारखाना आपला परिवार आहे. कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक बारकाईने कारभार बघत आहेत. आम्ही मदत करत आहोत. अर्थ, सहकार व कृषी खात्याच्या माध्यमातून कारखान्यांना मदत केली जात आहे. बँकेच्या माध्यमातून व्याजामध्ये सवलत देणार आहे. सहवीजनिर्मितीच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल. कारखान्याचे वैभव टिकविण्यासाठी सभासदांनी सर्व ऊस छत्रपती कारखान्यालाच गाळपासाठी द्यावा. अधिकारी व कामगारांनी साथ द्यावी. कामगारांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे. सभासदांचे नुकसान होऊ देणार नाही,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथे श्री छत्रपती कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ व गव्हाण पूजनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, “चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये अॅडव्हान्स किती मिळेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र, सध्या याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. चालू गळीत हंगामामधील उसाच्या रिकव्हरीनुसार एफआरपी द्यावी, असे काहींचे मत आहे. तर, गेल्यावर्षीच्या उसाची रिकव्हरी विचार करून एफआरपी रक्कम द्यावी, अशीही मागणी आहे. याबद्दल न्यायालयामध्ये याचिका दाखल आहेत. मात्र, शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही. सभासदांचे नुकसान होणार नाही.”
यावेळी कृषिमंत्री भरणे म्हणाले, छत्रपती कारखाना आपल्या सर्वांचा आहे. कारखान्याचा दर चांगला राहणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या उसाचे गाळप होईल. सर्व शेतकऱ्यांनी ऊस घालून सहकार्य करावे.” कारखान्याचे अध्यक्ष जाचक म्हणाले, “शेतकऱ्यांच्या बिलातून कसलीही कपात केली जाणार नाही. उसाची तोडणी नियमानुसार होणार आहे.” यावेळी गुणवडी येथील तानाजी काटे यांचा एकरी १२८ टन ऊस काढण्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सारिका भरणे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक शिवाजी निंबाळकर, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी सागर राजपुरे, सुचिता सचिन सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे आदी उपस्थित होते.












