कवर्धा : कवर्धा जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली इथेनॉल प्लांटला कुलूप ठोकले. येथे तयार करण्यात येणारे पोटॅश खत हे याचे कारम आहे. हे खत निकृष्ट दर्जाचे निघाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून प्रशासनाने इथेनॉल प्लांटवर जप्तीची नोटीस बजावली आहे. रामहेपूर येथे असलेल्या एनकेजे इथेनॉल कंपनीला या दुहेरी संकटाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी प्रशासनाने जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांसाठी २४ कोटींच्या मोलॅसेस बिल वसुलीसाठी प्लांटला जप्तीची नोटीस बजावली होती. या प्रकरणात प्रशासनाने ३० मे पर्यंतची मुदत दिली होती. आता शेतकऱ्यांनी इथेनॉल प्लांट विरुद्ध आंदोलन केले.
‘इटीव्ही भारत’ने दिलेल्या वृत्तानुसार, निकृष्ट खतामुळे भारतीय किसान संघाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. इथेनॉल प्लांटमध्ये उत्पादित होणाऱ्या पोटॅश खतामुळे नुकसान झाल्याचा आरोप करत प्लांटच्या गेटला कुलूप लावले. कारखान्याच्या मोलॅसिसच्या देयकासह सहा मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. इथेनॉल प्लांटच्या मालकाने जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांचे मोलॅसिसचे १९ कोटी रुपये दिलेले नाहीत. परिणामी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिले दिलेली नाहीत. इथेनॉल प्लांटमध्ये तयार होणाऱ्या पोटॅश खताचे प्रमाण १४ टक्के प्रमाणाचे असावे. जे फक्त १ ते ३ टक्के असल्याने पिके नष्ट झाली आहेत असे भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष डोमन चंद्रवंशी यांनी सांगितले.